बंद

बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिराचा समारोप

बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिराचा समारोप
क्रीडा क्षेत्रातही हिंदी विद्यापीठ आघाडीवर : प्रो. रजनीश कुमार शुक्ल
वर्धा, 05 जुलै 2022: हिंदी विद्यापीठ ज्ञान, कला आणि कौशल्या बरोबरच क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर असेल असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी केले. ते आझादी च्‍या अमृत महोत्‍सवा अंतर्गत 20 मे ते 03 जुलै या कालावधीत 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आयोजित बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिराच्‍या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्‍यक्ष म्‍हणून बोलत होते. 4 जुलै रोजी दूरशिक्षण संचालनालयाच्या इमारतीत आयोजित समारंभात वर्ध्याचे खासदार श्री रामदास तडस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुलगुरू प्रो. शुक्ल म्हणाले की विविध प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. विद्यापीठ आपल्‍या स्‍थापनेचे २५ वे वर्ष साजरे करत असून या वर्षात दैदीप्‍यमान कामगिरी बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार रामदास तडस म्हणाले की, खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठासारख्या संस्थांनी पुढे आले पाहिजे. भारत सरकारच्या खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून या भागातील खेळाडूंना ऑलिम्पिकपर्यंत नेण्‍याची गरज आहे असेही ते म्हणाले.
यावेळी समारोपीय सामना खेळवण्यात आला. यामध्ये मुलींमध्ये क्रिष्णा मस्के आणि मुलांमध्ये जैनुल आबिदीन खान विजेते आणि वंशिका मते आणि शांतिक नाथ त्रिपाठी उपविजेते ठरले. विजेत्यांना कुलगुरू प्रो. शुक्ल आणि खासदार रामदास तडस यांनी प्रशस्ती पत्र तर बॅडमिंटन प्रशिक्षक सत्यम अधिकारी यांना शॉल, विद्यापीठाचे प्रतीक चिन्ह आणि सुतमालेने सन्‍मानित केले. प्रारंभी कुलगुरू प्रो. शुक्ल आणि खासदार रामदास तडस यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या मूर्तीला माल्‍यार्पन अर्पण करून तर स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. डॉ. जगदीश नारायण तिवारी यांनी मंगलाचरण सादर केले. स्वागत वक्‍तव्‍य क्रीडा समितीचे उपाध्यक्ष प्रा. नृपेंद्र प्रसाद मोदी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सहायक प्रोफेसर डॉ. गौरी शर्मा यांनी केले तर आभार कार्यक्रम संयोजक क्रीडा सचिव अनिकेत आंबेकर यांनी मानले. यावेळी प्र-कुलगुरू प्रो. चंद्रकांत रागीट, कुलसचिव कादर नवाज खान, अधिष्‍ठातागण, विभागप्रमुख, शिक्षक , खेळाडु व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.